िंवा गहीनीनाथ. नाथपंथामध्ये महत्त्वाची भूमिका वठवून,नाथपंथाचे फार मोठे कार्य गहीनीनाथाने केले. करभंजन नारायण उर्फ गहिनीनाथ नवनारायणांनी आपला कार्य अवतार संपवून यापूर्वी नाथ पंथाचे सर्व सामर्थ्य शिस्त कार्यपद्धती व हेतू हे गहिनीनाथां मार्फत निवृत्तीनाथां पर्यंत सोपवले. नाथपंथाचे निवृत्तीनाथ हे पहिले नाथ आहेत की जे कुटुंब व्यवस्थेतून आलेले सत्पुरुष आहेत. यापूर्वीचे सर्व नाथ हे अयोनी संबंधातून अवतरले होते निवृत्तीनाथ हे कुटुंब व्यवस्थेतून कार्यासाठी अवतरले अयोनी संबंधातून प्रगट झालेल्या सर्वनाथांनी आपल्या सर्व शक्ती साधना सामर्थ्य देवतांनी दिलेले वचन आणि वाम शक्तींनी दिलेले वचन आणि स्वतः निर्माण केलेले काव्य मंत्र हे गहिनीनाथांकडे सोपवून गोरक्षनाथांच्या योजनेप्रमाणे गहिनीनाथांनी ते सर्व, निवृत्तीनाथांकडे सोपविले. अशा तऱ्हेने जो नाथपंथ होता तोच, त्याच उद्देशाने, त्याच सामर्थ्याने आणि त्याच योजनेप्रमाणे पुढे कार्य करू लागला . आजही हा पंथ अखंड गुरुपरंपरेने त्याच पद्धतीने, सामर्थ्याने, उद्देशाने, शिस्तीने कार्य करीत आहे ज्या गहिनीनाथांनी हे सर्व योनि संबंधातून प्रगट होणार्‍या पुरुषांकडून सोपवले त्यावेळी गहिनीनाथांनी, नाथांचे विचार , शिकवणूक आणि कलियुगातील सर्वच लोकांना त्यांनी आपला संदेश पुढील प्रमाणे दिला आहे गहिनीनाथांचे स्वभाव व जीवन वैशिष्ट्ये सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत. या युगामध्ये भगवंताचे वेगवेगळे रंग, नामे आणि आकृती असतात. तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पुजा केली जाते. सत्ययुगामध्ये भगवंताचा रंग शुभ्र असतो. त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात. ते वल्कले नेसतात. कृष्णाजिन, यज्ञोपवीत, रुद्राक्षांची माळ, दंड आणि कमंडलू ते धारण करतात. या युगातील माणसे शांत, वैरभाव न बाळगणारी, सर्वांचे हीत चिंतणारी आणि समदर्शी असतात, इंद्रिये आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्‍चर्येने देवाची आराधना करतात. या युगात हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्या ही त्यांची नांवे असतात. त्रेता युगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो. त्यांना चार हात असतात. ते तीन मेखला धारण करतात. त्यांचे केस सुवर्णासारखे असतात. ते वेदांनी प्रतीपादन केलेल्या यज्ञाच्या रुपात राहून स्त्रुक, स्त्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात. या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययन, अध्यापन करणारे असतात. ऋग्वेद, यजुर्वेद, आणि सामवेद वेदत्रयींच्या द्वारे ते सर्व देवस्वरुप भगवान श्रीहरींची आराधना करतात. त्रेता युगामध्ये त्यांना विष्णू, यज्ञ, पृष्णिगर्भ, सर्वदेव, उरुक्रम, वृषाकपी, जयंत आणि उरुगाय या नांवानी संबोधतात. द्वापार युगात भगवंताचा रंग सावळा असतो. ते पितांबर धारण करतात. शंख, चक्र, गदा, पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात. वक्षस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि कौस्तुभ मणी इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात. त्यावेळी जिज्ञासू माणसे, राजचिन्हयांनी युक्त अशा त्या परमपुरुषांची वैदीक आणि तांत्रीक विधींनी आराधना करतात. द्वापार युगांतील लोक म्हणतात - वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुध्द या चतुर्व्यह रूपात असणार्‍या आपणांस आम्ही नमस्कार करतो. ऋषी नारायण, महात्मा नर, विश्‍वेश्वर, विश्वरुप आणि सर्व भुतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो. कलीयुगामध्ये भगवंताचा कृष्णवर्ण असतो. इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते. ते हृदय इत्यादी अंगे. कौस्तुभ इत्यादी उपांगे, सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रवृती पारषदांनी मुक्त असतात. श्रेष्ठ बुध्दीमान पुरुष कलीयुगात, नाम संकीर्तन रूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात. लोक अशी स्तुती करतात. हे शरणागत रक्षका आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य, सांसारिक संकाटांचा नाश करणारे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत. ते तीर्थस्वरूप आहेत, शिव, ब्रम्हदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात. शरण जाण्यास योग्य सेवकांच्या सर्व विपत्तीचा नाश करणारे व संसार सागर पार करुन नेणारी ती नौका आहे. हे महापुरुष अशा आपल्या चरणाविंदांना मी वंदन करीत आहे. हे धर्मशील महापुरुष रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरुन देवतांनी सुध्दा इच्छा करावी आणि जी सोडून जाणे अशक्य, अशा राज्यलक्ष्मीला सोडून राजा वनात फिरत राहिले पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा ज्यांनी पाठलाग केला त्या चरणारविंदांना, प्रभू रामचंद्रांना, मी वंदन करतो. निरनिराळया युगांतील लोक याप्रमाणे आपापल्या युगानुरूप नाम रुपांनी भगवंताची आराधना करतात कारण सर्व पुरुषार्थांचे स्वामी श्रीहरीच आहेत. कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात. संसारचक्रामध्ये फिरणार्‍या माणसांना भगवंताच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही. कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परम शांतीचा अनुभव येतो. सत्य, त्रेता, आणि द्वापार या युगातील प्रजेला असे वाटते की, आपला जन्म कलियुगात व्हावा. कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवत्परायण भक्त जन्माला येतील. म्हणून कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळसे भक्त होतील तेथे ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, परम पवित्र कावेरी, महानदी आणि प्रचिची नावाच्या नद्या वाहातात. राजन जे लोक नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतःकरण शुध्द होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात. जो कर्तृभाव सोडून सर्वत्यागभावाने शरणागतवत्सल, भगवान मुकुंदांना शरण जातो, तो देव,ऋषी, भूत, कुटुंबीय, अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही. जो भक्त आपल्या प्रियतम भगवंताच्या चरण कमलांचे अनन्य भावनेने भजन करतो त्याच्या कडून चुकून एखादे पाप कर्म घडले, तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरी ते सगळे धुऊन टाकतात. अशाकांही विशेष विचार सरणीचे गहनीनाथ म्हणजे करभंजन नारायण होते. अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे अतुलनीय सामर्थ्याचे कृपा छत्र व सान्निध्य या पंथाला व पंथाच्या माध्यमातून समाजाला लाभले आहे. अशा योगेश्वरानंदनांच्या अनुभूती आजदेखील भाविक लोक घेऊन आपले जीवन कृतार्थ करीत आहेत. कलियुगातल्या लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा आत्मोन्नती व्हावी या उद्देशाने नाथांनी ह्या प्रमाणे उपदेश केला आहे.